Monday 26 September 2016

सुख म्हणजे नक्की काय असत?

      सुख म्हणजे नक्की काय असते? कोणास माहीत! कोणी पाहिलय? प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा, अनुभूती वेगवेगळी! पण सगळे सुखाच्या मागे धावत असतात.  पकडून ठेवायचा प्रयत्न करत असतात. आणि ते मात्र मृगजळाप्रमाणे, समोर दिसते, पण पकडायला गेले तर ते तिथे नसतेच! मग ते असते कुठे? आपल्या मनामध्ये? कल्पनेत? की तो एक फक्त आभास असतो? सुख ही एक आपल्या भावनिक अनुभवाची कल्पना आहे. हा अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. त्याच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्या अनुभूतीची तीव्रता, जाणीवेची तीव्रता, हे सर्व व्यक्तिसापेक्ष आहे. जेव्हढी तीव्रता जास्त, तेव्हढी त्या सुखाची अनुभूती जास्त.आणि हो, या अनुभूतीचीही प्रत्येकाची कल्पना वेगळी वेगळीच!ज्या गोष्टीमुळे एकाला स्वर्गसुखाचा अनुभव येतो, त्याच गोष्टीबद्दल दुसर्‍याला घृणा पण असू शकते.

मग सुख म्हणजे काय? ज्याप्रमाणे अंधाराचा अभाव, म्हणजे प्रकाश असे म्हणतो, त्याच प्रमाणे दुःखाचा अभाव म्हणजे सुख असते का? माहीत नाही, पण सुखाबद्दल एव्हढा सगळा विचार करण्याऐवजी आपण आपल्या सुखाचे क्षण मोजावेत.
 कोणत्याही स्त्रीला विचारा, असह्य प्रसूतीवेदना सहन करून श्रांत-क्लांत झाल्यावरही तिच्या बाळाचे पहिले ’ट्याहा’ तिला स्वर्गसुख देऊन जाते. तो बाळाचा पहिला स्पर्श म्हणजे स्वर्ग सुख नाही तर आणखी काय? पण कितीतरी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही सुख असते-------
             सुख असते--     वार्‍य़ाच्या मंद झुळकेत,
                                     पावसाच्या पहिल्या शिडकाव्यात,
                                     तापलेल्या धरतीवर पाऊस पडल्यावर दरवळणार्‍या सुगंधात
                                     खिडकीतील मोगर्‍याच्या  सुवासात.
           सुख असते          आपल्या लहानग्यांनी मारलेल्या मिठीत
                                     नवर्‍याच्या कौतुकाच्या नजरेत
                                     मैत्रिणीच्या गुजगोष्टींमध्ये
                                     सर्व आठवणींमधे हरवून जाण्यात!
          सुख असते---       कोणासाठीतरी काहीतरी करण्यात,
                                     सर्वांना पोटभर खाऊ घालण्यात,
                                     'You are the Best!' हे ऐकण्यात,
                                      कोणासाठीतरी स्वतःला हरवून जाण्यात!
          सुख द्यावे --सुख घ्यावे, सर्वांनी सुखी असावे.