उर्वशी
का, का, का? नेहेमीच सगळी जबाबदारी स्त्रीची असते का? अनादी काळापासून आपण हेच
पहात आलो की कुटुंब सावरण्याची, मुलांचे संगोपन करण्याची, वेळेला त्यांच्या सर्व
गरजा पुरवण्याची सर्व जबाबदारी स्त्रीची असते का? स्त्रीनेच पावित्र्य संभाळायचे,
आणि ते मलिन करणारा संभावित, मोकळा सुटतो, आणि स्त्रीला शिक्षा होते, समाजातून
बाहेर काढले जाते किंवा मग ती स्वतःच आपले जीवन संपवते. आपल्या पुराणात, महाभारतात
अशी असंख्य उदाहरणे सापडतील.
स्त्रीला स्वतःच्या भावना, इच्छा, आकांक्षा असण्याची मनाई आहे. ते समाजात चालत
नाही. तिने पुरुषाच्या तालावर नाचले पाहिजे. स्त्री म्हणजे मनोरंजनाची, उपभोगाची
वस्तु. तिला मन नाही. भावना नाहीत. आशा आकांक्षातर अजिबात नाहीत. किंवा नसाव्यात,
हेच पुरुषप्रधान समाजाने, संस्कृतीने ठरवले आहे.
अरुणा ढेरे यांनी लिहिलेल्या ‘उर्वशी’ या पुस्तकात आपल्याला ही गोष्ट
प्रकर्षाने जाणवते.
उर्वशी ही एक अप्सरा आहे. देवराज इंद्र याच्या दरबारात नृत्य गायन करून आणि
इतर वेळी इंद्राच्या आज्ञेवरून देवांच्या तसेच इंद्राच्या खास अतिथींचे हर तर्हेने
समाधान करणे हे अप्सरांचे काम. अर्थातच, या सर्व अप्सरा अती सुंदर, कमनीय आणि चिरतरुण आहेत. पण उर्वशी या सर्वांपासून
वेगळी, विशेष आहे. तिची उत्पत्ती पण विशेष आहे. नर-नारायण ऋषींपैकी नरऋषींच्या
मांडीपासून हिची उत्पत्ती आहे. इंद्राला दाखवायला, की खरे सौदर्य काय असते!
नरापासून उत्पत्ती झाली असल्यामुळे उर्वशी बुद्धिमान आहे, चतुर आहे, मानी आहे,
मनस्वी आहे. तिने इंद्राला वश केले आहे. तो तिचे वेगळेपण जपतो. पण तरीही ती अप्सरा
असण्याच्या नियतीला बांधली गेली आहे.
या कादंबरीमध्ये अरुणा ढेरे तिच्या मनाच्या आत डोकावतात. स्त्रीसुलभ भावना,
इच्छा यांचा उहापोह करतात. तिच्याच नाही तर तिची सखी चित्रलेखाच्याही भावनांबद्दल
लिहितात. अप्सरा आहे, तिला पण कोणाचे आकर्षण वाटू शकते, पण तिला स्वतःचे अपत्य
असण्याचा अधिकार नाही. जर झालेच तर त्याला जन्मतःच सोडून द्यावे लागते असे नियम
आहेत. देवेंद्राचे उर्वशीबद्दलचे आकर्षण लपलेले नाही, पण चित्रलेखाही देवेंद्रावर
प्रेम करते. देवेंद्र उर्वशीशी एकनिष्ठ असणे आवश्यक नाही! कितीही प्रेम असले तरी
कावेबाज देवेंद्र उर्वशीचा आपल्या फायद्यासाठी तिचा उपयोग करून घेतोच.
नेहेमीप्रमाणे युद्ध हरायला लागल्यावर इंद्रदेवाला मानवी मदत लागते. तो
पराक्रमी राजा पुरूरवाला पाचारण करतो आणि युद्ध जिंकतो. इंद्राचे अतिथ्य घेत
असतांना पुरूरवा उर्वशीच्या प्रेमात पडतो. तिलाही त्याच्या पौरुषाचे, पराक्रमाचे
आकर्षण वाटते. पुरूरव्याला खुश करण्याची संधी सधतो आणि उर्वशीला त्याच्या स्वाधीन
करतो. पुरूरवा तिला आपल्या राजधानीला घेऊन येतो तिच्या प्रेमात आकंठ बुडून जातो.
उर्वशी पण सुखसागरात बुडून जाते. होणारे चुकत नाही. उर्वशीला दिवस जातात. ती
त्याचा ही आनंद अनुभवते. विसरून जाते की ती अप्सरा आहे, आणि तिला शेवटी
इंद्रलोकाला परत जायचे आहे. इंद्र सर्व घटनांची खबरबात घेत असतो. शेवटच्या क्षणी
इंद्राचा दूत येऊन उर्वशीला सत्याची जाणीव करून देतो. यथावकाश ती पुत्र प्रसवते.
आणि पुत्राचे मुख्दर्श्नही न करता स्वर्गात निघून जाते. तिचा रोम रोम आक्रोश करत
असतो पण नियतीच्या पुढे काही चालत नाही. स्वर्गलोकात तिची सखीही दुःखी आहे. तिच्या
नशिबातही काही वेगळे नाही!
उर्वशीचा धूर्ततेने उपयोग करून घेण्यात आलेला आहे हे तिला नंतर उमगते.
पुरूरव्याला अपत्य नाही. त्याल पुत्राची आस आहे. अनायासे उर्वशी उपलब्ध आहे. उत्तम
पुत्र होणार याची खात्री आहे. इंद्र आणि पुरूरवा दोघांनी उर्वशीचा स्वतःच्या
साध्यासाठी उपयोग करून घेतला आहे!
अरुणा ढेरे कथा अतिशय प्रभावीपणे मांडतात. कथा चित्रलेखा, इंद्र, पुरूरवा आणि
शेवटी उर्वशी यांच्या प्रथम पुरुषी निवेदनातून पुढे सरकते. मनोव्यवहारांचे वर्णन व
त्यातून होणारे प्रभावशाली व्यक्तिचित्रण अप्रतिम आहे. भाषा प्रवाही, रसाळ व वेधक
आहे. कुठेही कथेला बाधक ठरत नाही. प्रसंग वर्णन आपल्या समोर संपूर्ण दृष्य उभे
करते. आणि पुस्तक संपविल्याशिवाय आपण खाली ठेऊ शकत नाही.
अरुणा एरंडे.