Wednesday, 1 July 2015

memories

माझा अविस्मरणीय अनुभव
खरे तर आपल्या जीवनात जे काही बरे वाईट घडते, ते आपण कधीच विसरू शकत नाही. अगदी ठरवून सुद्धा! म्हणजे मग सगळेच अविस्मरणीय, नाही का? पण लोकशाहीत जसे सगळे लोक समान असतात, पण काही काही लोक जरा जास्त समान असतात, तसेच कही काही अनुभव पण जरा जास्त अविस्मरणीय असतात. आता त्यातून एक निवडायचा तर कठीण. पण सध्या एकच पुरे.
      त्यावेळी आम्ही काश्मिरमध्ये रहात होतो. म्हणजे माझे पती त्यांच्या कामाच्या जागी, व्हेरिनाग येथे. अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. या ठिकाणी झेलम नदीचा उगम आहे. उगमाच्या ठिकणीच नदीचा स्रोत इतका मोठा आहे की त्यावर जवळ जवळ ५० फ़ूट व्यासाचे  २२० फ़ूट खोलीचे अष्टकोनी कुंड बाधलेले आहे. बाजूनी दगडी कमानी आहेत. त्यात सोनेरी आणि रुपेरी रंगांचे दीड, दोन फ़ूट लांबीचे ट्राउट मासे पोहत असतात. अर्थातच तिथे मासे पकडायला बंदी आहे. १० फ़ूट रुंदीचा झेलमचा निर्झर समोर खळखळा वहात असतो. त्याच्या दुतर्फा विविध फुलांनी आणि हिरवळीने सजलेली प्रचंड मोठी बाग आहे. पूर्वी बर्‍याच सिनेमांचे शूटिंग इथे व्हायचे. असे म्हणतात की ही बाग पहिले बांधली आणि मग याच्या धर्तीवर श्रीनगरच्या शालिमार आणि निशात बागा तयार केल्या!
      शेजारी असलेल्या छोट्या टेकडीवर आमचे छोटेखानी बंगले होते. ज्यावेळी सन्‍ १९५८ मध्ये जर्मन लोक जवाहर टनेल बनवत होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या राहण्यासाठी हे बंगले बांधले होते. आता ते बॉर्डर रोड्सच्या ताब्यात होते. त्यांची आखणी पण सुंदर होती. आमच्या स्वतःच्या फुलबागा होत्या. आणि घराच्या मागच्या बाजूला भाजी, शेती इत्यादी. पाहिजे ते लावा.  आम्ही तिथे ७-८च फ़ॅमिलीज होतो.  अगदी चुरशीने विविध फुलांची आणि भाज्यांची लागवण करायचो. अर्थातच, आमच्या प्रत्येकाच्या दिमतीला एक स्वतंत्र माळी होता. रोज सकाळी नवरे लोक ब्रेकफ़ास्ट करून ऑफ़िसला गेले की मग बाहेर पडायचे. माळ्याबरोबर बागेत फेर-फटका. कुठे काय लावायचे, काय खत आणायचे वगैरे वगैरे. म्हण्जे तो अनुभवी असल्यामुळे तो सांगायचा आणि आपण मान डोलवायची. सकाळी त्या सुंदर फुलांचे दर्शन मन प्रसन्न करायचे. मग परसदारी, मुलीच्या समवेत जायचे. ताजी कोवळी गाजरे, लाल मुळे उपटून खायला मजा यायची. घरात सफर्चंद, पेअर, प्लम्स इ.ची पण झाडे होती. मुली झाडांवर चढून फळे तोडून खायच्या. एकूणच अतिशय सुखाचा आणि मजेचा काळ होता. माझेही वय लहान होते. मी फक्त जगातील सौंदर्यच पाहिले होते. खर्‍या जगातील गतिविधींची अजून ओळख व्हायची होती. मी प्रत्येक छोट्या गोष्टीतून आनंद घेण्यात मशगुल होते. खरे तर माझी मोठी मुलगी तेव्हा ७ वर्षांची होती शाळेत घालायला हवे होते. पण मी घरीच तिचा अभ्यास घेत होत. पुढच्या वर्षी एकदम तिसरीत घालण्यासाठी. त्यासाठी मला मुलींना घेऊन श्रीनगरला रहावे लागणार होते. तोपर्यंत आम्ही आयुष्याचा आनंद उपभोगत होतो.
दिवस तसा साधाच होता. आधी सांगितल्याप्रमाणे, सकाळी ब्रेकफ़ास्ट, बागेत फेरफटका, मग अंघोळी आणि कपडे धुणे! हो तिथे कपडे धुवायला कोणी मिळत नाही. आणि मग बाहेर पडायचे. रो कोणातरी एकीच्या घरी जमायचे. सगळ्यांच्या हातात लोकर आणि सुया. थंडीच खू ना तिकडे. थंडीच्या रोज दिवसात ३-४ स्वेटर्स लागायचेच. त्यामुळे कितीही स्वेटर विणले तरी कमीच! रोज नवीन नवीन स्नॅक्स. मजा. १२.३० ल घरी कारण नवरे लोक १ वाजता घरी यायचे. आता जेवण कोण करत होते, हा प्रश्न पडला असेल ना? आमच्या प्रत्येकाच्या घरी एक कुक होता.ते त्याचे किचन होते. आम्हाला तिथे त्याच्या परवानगीनेच प्रवेश! तर १ वाजता जेवण आणि मग वामकुक्षी. ४ वाजता काहीतरी गेमस्‍. बहुतेक बॅड्मिंट्न. किंवा मग मेस मध्ये पत्ते कुटायला. १ पैसा पॉईंट रमी. क्वचित ब्रिज. ६.३०- ७ पर्यंत घरी पार्टी नसेल तर रात्री जेवण आणि झोप.
सुंदर जीवन क्रम होता. पण प्रत्येक गोष्टीला अंत असतोच. माझे हे सुंदर जीवन पण श्रीनगरला  गेल्यावर थांबले असे नाही तर कमी झाले. मुलींच्या शाळा सुरू झाल्या. बाकी सकाळचा दिनक्रम बाग सोडली तर तसाच राहिला. दुपारी मुली घरी आल्यावर त्यांचे खाणे-पिणे, अभ्यास इ.मध्ये वेळ जाऊ लागला. आणि त्यामध्ये मी रमले. तिथे असतांना तर खूपच असे अनुभव आले, जे अविस्मरणीय आहे. ते पुन्हा केव्हातरी.